ऐतिहासिक सफर: मनपा विद्यार्थ्यांची भरारी, इस्रो दरबारी

---Advertisement---

 

Nashik Municipal Corporationच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या दिशेने टाकलेले पाऊल आता अंतराळापर्यंत पोहोचले आहे. ‘मनपा विद्यार्थ्यांची भरारी, इस्रो दरबारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत शहरातील २६ गुणवंत विद्यार्थी Indian Space Research Organisation (ISRO) ला भेट देण्यासाठी विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच नाशिकच्या शैक्षणिक लौकिकात भर घालणारा ठरत आहे.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, बदलत्या तांत्रिक युगात मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनासारख्या प्रगत क्षेत्रात पुढे यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तर उपमहापौर विलास शिंदे यांनी या विद्यार्थ्यांमधून भविष्यात देशाच्या संरक्षण, विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे अधिकारी घडतील, असा विश्वास व्यक्त केला.


इयत्ता ७ वी ते ९ वीतील निवडक विद्यार्थ्यांचा हा चमू २३ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान इस्रोच्या अभ्यासदौऱ्यावर आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि विज्ञानातील नव्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
निवड प्रक्रिया पारदर्शक आणि स्पर्धात्मक
या उपक्रमासाठी एकूण ११८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १ डिसेंबर २०२५ रोजी १४ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यातून १०१ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सखोल मुलाखतीनंतर अंतिम २६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.


हा संपूर्ण उपक्रम CREDAI नाशिक, रामचित्रा हसमतराय फाउंडेशन आणि मिलन रेक्झिन यांच्या CSR निधीतून राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास आणि इतर सर्व खर्च मोफत करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी या संधीपासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
पालकांचा आनंद, विद्यार्थ्यांना नवी दिशा
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विमानप्रवास आणि इस्रोसारख्या संस्थेला भेट देणे हे त्यांच्या मुलांसाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला विविध अधिकारी, शिक्षक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, ‘यंत्रभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील विद्यार्थी आता ‘अंतराळभूमी’कडे झेप घेत असून, हा उपक्रम त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---