---Advertisement---
जळगावच्या अमळनेर शहरातील एका महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला असून एका प्राध्यापकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील एका कॉलेजमधील संबंधित प्राध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणाचेही आरोप करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, २००८ पासून या प्राध्यापकाविरोधात तक्रारी होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, संबंधित शैक्षणिक संस्थेकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी २३ एप्रिल रोजी अमळनेर पोलिस ठाण्यात या प्राध्यापकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारींनंतर प्राचार्यांनी प्राध्यापकाला तंबी दिली होती. त्यानंतर संतप्त होऊन प्राध्यापकाने प्राचार्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे, आणि याच प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे समोर येत असून विद्यार्थिनींच्या मजबुरीचा फायदा घेतल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









