---Advertisement---
सोयगाव तालुक्यातील जंगला गावाजवळ सोमवारी (दि. २७) सकाळी सुमारे सातच्या सुमारास मिठाने भरलेला कंटेनर उलटल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधून दांडी मीठ घेऊन एमएच २१ बीएच १७१९ क्रमांकाचा कंटेनर सोयगावकडे येत होता. चालक दिनेश चव्हाण (रा. शिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि क्लिनर परमेश्वर पवार (रा. भवानी पांगरी, ता. बदनापूर) हे फर्दापूरमार्गे प्रवास करत असताना जंगला गावाजवळील वळणावर कंटेनरचा हुक तुटला. त्यामुळे मिठाने भरलेला भाग रस्त्यावर उलटला, तर पुढील केबिन काही अंतर पुढे जाऊन थांबली.
या अपघातात चालक आणि क्लिनर दोघेही सुखरूप बचावले. मात्र घटनास्थळी मिठाच्या गोण्या रस्त्यावर सांडल्याचे दिसून आले. सोयगाव–फर्दापूर मार्ग हा नेहमीच वर्दळीचा असल्याने अपघाताची वेळ सकाळी असल्यामुळे संभाव्य मोठी हानी टळल्याचे सांगितले जात आहे.









