---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भरदिवसा धाडसी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात घडली असून, शोभा सुधाकर जयकारे (वय ४५) यांच्या घरात ही धाडसी घरफोडी झाली आहे. त्या आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी थेट कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार ६५३ रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याच्या अंगठ्या, कानातले, लहान दागिने, चांदीचे साहित्य आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. घटनेनंतर घरी परतलेल्या शोभा जयकारे यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









