---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या कॉपर केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला असून, या गुन्ह्यातील ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान आणखी ३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील नवापाडा शिवारात घाटगे पाटील इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या एल-११ टॉवरमधून ६०० स्क्वेअर एमएम क्षमतेची १६० मीटर लांबीची कॉपर केबल चोरीला गेली होती. या केबलची किंमत सुमारे ६५ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला होता.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी मंगलदास महारू चौरे (रा. पांगण, ता. साक्री) याला २१ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. पुढील चौकशीत इतर आरोपी खंडू गायकवाड, अनिल ठाकरे, गोट्या अहिरे, गुलाब बागुल, राहुल गायकवाड, संजय गायकवाड आणि ताराचंद ठाकरे (सर्व रा. पांगण, ता. साक्री, जि. धुळे) यांना ताब्यात घेऊन २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ईको गाडी (एमएच १८ सीएल २०४९) तसेच कॉपर केबलसह एकूण ४ लाख १० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत कसून चौकशीदरम्यान आरोपींनी इतर तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्या प्रकरणांचाही उलगडा करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली









