---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फाटलेल्या नोटेवरून झालेल्या वादातून दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली असून, लोखंडी पाईपने डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील ‘साक्षी ऑटो पार्ट्स’ दुकानात घडली. तक्रारदार अजय कन्हैयालाल माखीजा (रा. सिंधी कॉलनी) यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकाने “फाटकी नोट का दिली?” या कारणावरून वाद घालत गोंधळ घातला.
यानंतर संशयित ठाणसिंग मेहरे आणि त्याचा मुलगा मोहित मेहरे (वय २०, रा. शिवपूर कन्हाळा) यांच्यासह आणखी ७ ते ८ जणांनी एकत्र येत दुकानदारावर हल्ला केला. आरोपींनी लोखंडी पाईपने डोक्यात मारल्याने दुकानदार गंभीर जखमी झाला, तर इतरांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
जखमी दुकानदाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार जयेंद्र पगारे करत आहेत.









