---Advertisement---
जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली. भारत गॅसच्या गोदामासमोर असलेल्या दोन उद्योगांना लागलेल्या या आगीमुळे परिसरात धावपळीचे वातावरण निर्माण झाले. आगीची तीव्रता इतकी होती की शहराच्या विविध भागांतून धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत होते.
दुपारी सुमारे दोन वाजताच्या दरम्यान ‘जे ब्रदर्स’ आणि शेजारील ‘श्री एंटरप्रायझेस’ या कंपन्यांमध्ये आग लागल्याचे समोर आले. ‘जे ब्रदर्स’मध्ये खोबरेल आणि सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जाते, तर ‘श्री एंटरप्रायझेस’मध्ये प्लास्टिकच्या चटया तयार केल्या जातात. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले.
आग भडकत असताना आतून स्फोटांचे आवाज येऊ लागले. तेलाचे डबे आणि रासायनिक पदार्थांच्या पिंपांमुळे हे स्फोट झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे सहा बंब वापरले गेले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता, समोरच्या भारत गॅस गोदामातूनही पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
या घटनेत दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार माल आगीत जळून खाक झाला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उष्णता वाढणे किंवा शॉर्ट सर्किट यापैकी कोणत्यातरी कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.









