---Advertisement---
नाशिक/छत्रपती संभाजीनगर:
संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणात पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान हिला गेल्या २७ दिवसांपासून सुरू असलेल्या लपाछपीनंतर अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत गुप्त मोहिमेद्वारे अटक केली आहे.
२७ दिवसांचा थरार आणि पोलिसांची मोठी कारवाई
२ मे रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तिने न्यायालयात खोटी माहितीही दिली होती, मात्र जामीन फेटाळल्या गेल्यापासून ती वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी संभाजीनगर गाठले आणि तिला बेड्या ठोकल्या. तिला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असून, या अटकेमुळे आता अनेक ‘मोठे मासे’ गळाला लागण्याची शक्यता आहे.
’तौसीफ अत्तार’ मुख्य सूत्रधार; धक्कादायक माहिती समोर
सुरुवातीला निदा खान हीच या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचे वाटत होते, परंतु पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसीफ अत्तार हाच या संपूर्ण रॅकेटचा खरा मास्टरमाइंड म्हणून समोर आला आहे. पीडित महिला आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे की, तौसीफ हाच मुलींना फूस लावून धर्मांतरासाठी दबाव आणत असे आणि इतर आरोपींना संरक्षण देत असे. पोलिसांच्या हाती लागलेल्या काही व्हिडिओंमध्येही तौसीफ स्वतः धर्मांतर घडवून आणताना दिसत आहे.
धर्मांतरासाठी अघोरी प्रकार
सक्तीने नमाज आणि मांस भक्षण: एका पीडित पुरुष कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, तौसीफ त्याला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला, तिथे त्याला नमाज पढायला आणि टोपी घालायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याला धमकावून मांस खाण्यासही सक्ती केली.
गुंगीचे औषध आणि छळ: पीडित महिलांनी आरोप केला आहे की, आरोपी गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करत असत आणि त्यानंतर त्याचे चित्रीकरण करून पीडितांना धमकावले जात असे.
संजय शिरसाट यांचा घणाघात आणि SIT ची मागणी
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांना जलील यांचा जाहीर पाठिंबा आहे.
त्यांनी तरुणांच्या जीवनशैलीवरही प्रश्न उपस्थित केले. “बेरोजगार मुलांकडे दीड-दीड लाखांच्या दुचाकी आणि आयफोन कोठून येतात? यामागे नक्कीच मोठे आर्थिक रॅकेट आहे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला. संभाजीनगर हे अशा कारवायांचे केंद्र बनत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पीडितांचा आकडा वाढण्याची शक्यता
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान एकूण ९ महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला लोक घाबरलेले होते, परंतु पोलिसांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर एकाच दिवसात ८ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्या. तपासाची व्याप्ती पाहता, या ‘मिशन कन्व्हर्जन’मध्ये सहभागी असलेले आणखी काही टीम लीडर्स आणि व्यवस्थापक पोलिसांच्या रडारवर आहेत.
या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ८ वर पोहोचली असून, निदा खानच्या चौकशीतून या आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.









