---Advertisement---
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर सर्वदूर मे महिन्यातील वैशाख वण्ाव्यावी दाहकता मोठया प्रमाणात असून तापमान किमान 45 अंशाच्या दरम्यान आहे. वाढत्या तापमानाच्या दाहकतेमुळे बाष्पीभवनाचा वेगात देखील कमालीचा वाढ होवून प्रकल्पांमधील पाणी पातळी झपाट्याने खाली येत आहे. तर दुसरीकडे विहिरींची पाणी पातळी देखील खोलवर गेलेली दिसून येत असून जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी 41.66 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तसेच सद्यस्थितीत अमळनेर आणि भुसावळ तालुक्यातील चार गावांसाठी सात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
गिरणेच्या आवर्तनामुळे चार तालुक्यांना दिलासा
जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर असे 3 मोठे, 14 मध्यम आणि 96 लघू असे प्रकल्प आहेत. या पैकी गिरणा प्रकल्पातून नुकतेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात पेयजलासाठीचे चौथे आरक्षीत आवर्तन सोडण्यात आले होते. चार पाच दिवसांनतर लगेचच ते बंद करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे चाळीसगाव एमआयडीसी, चाळीसगाव शहर, भडगाव आणि पाचोरा नगरपरिषदेसह अन्य ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी दिलासा मिळाला आहे.
तीन मोठया प्रकल्पात सरासरी 45.22 टक्के जलसाठा
गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडल्यानंतर सद्यस्थितीत प्रकल्प पाणीपातळी 168.95 दशलक्ष घनमीटर अर्थात 5.97 टिएमसी नुसार 32.27 टक्क्यांवर आली आहे. गतवर्षी याच दिवशी प्रकल्प पाणी पातळी 147.81 दशलक्ष घनमीटर अर्थात 5.22 टिएमसी नुसार 28.23 टक्के नोंद होती असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
हतनूर प्रकल्पात उपयुक्त पाणी पातळी 89.80 दशलक्ष घनमीटर अर्थात 3.17 टिएमसी नुसार 35.22 टक्के असून अजून तीन चार महिने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
वाघूर प्रकल्पात उपयुक्त पाणी पातळी 177.99 दशलक्ष घनमीटर अर्थात 6.29 टिएमसी नुसार 71.61 टक्के असून किमान वर्ष दिड वर्ष पुरेसा जलसाठा आहे.
सरासरी 41.66 टक्के उपयुक्त पाणीसाठा
जिल्ह्यातील मोठया, मध्यम आणि लघू प्रकल्पात 640 दशलक्ष घनमीटर अर्थात 22.62 टिएमसी नुसार सरासरी 41.66 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यात गिरणा 32.27, हतनूर 35.22, वाघूर 71.61, मन्याड 24.73, भोकरबारी 26.54, सुकी 74.92, अभोरा 62.50, अग्नावती 12.06, तोंडापूर 26.94, हिवरा 26.60, मंगरूळ 46.51, बहुळा 37.56, मोर 64.59, अंजनी 53.08, गुळ 58.09, शेळगाव बॅरेज 62.24 आणि 96 लघू प्रकल्पात 26.70 असा 640.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 22.62 टिएमसी नुसार सरासरी 41.66 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
चार गावांसाठी 7 टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात वाढते तापमान, नदी नाल्यामधील आटलेले जलप्रवाह, खोलवर गेलेले पाणी पातळी पहाता पाणीटंचाई मोठया प्रमाणात जाणवून येत आहे. सद्यस्थितीत चार गावांसाठी 2 शासकिय आणि 5 खासगी असे सात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. भुसावळ तालुक्यात एक, अमळनेर तालुक्यात 3 गावांसाठी 2 शासकिय व 4 खासगी असे 7 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच कालावधीत 14 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. असे प्रशासनाने म्हटले आहे.
संभाव्य टंचाई निवारणार्थ 37 गावांसाठी विहिर अधिग्रहण
तसेच आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनपातळीवरून टंचाई निवारणासाठी 37 गावांसाठी विहिर अधीग्रहण करण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यात जामनेर तालुक्यात 6 हजार 564 लोकसंख्येनुसार 4 गावांसाठी 2 टँकर भरण्यासाठी विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. रावेर, यावल, चाळीसगाव, पारोळा, तालुक्यात प्रत्येकी एक, चोपडा तालुक्यात दोन, बोदवड, पाचोरा प्रत्येकी 3, मुक्ताईनगर 9 आणि अमळनेर 12 असे 37 गावांसाठी 3 टँकरसाठी विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे.
वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर पाणी बचत आवश्यक
पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन हे पाणीटंचाईवर मात करण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निर्देशीत केल्याप्रमाणे गावातले पाणी गावात, यात आगामी काळात छतावरील पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टींग योजनेची अंमलबजावणी करीत आणि शेतातले पाणी शेतात जिरवल्यास भूजल पातळी वाढेल व पाणीटंचाईपासून सुटका होईल. प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व समजून घेऊन वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर पाणी वाचवण्याचा ध्यास घेतल्यास टंचाईवर निश्चितच मात करता येईल.
रोहन घुगे,
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष









