---Advertisement---
यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत अज्ञात माथेफिरूने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील तब्बल १ हजार ७०० केळीच्या झाडांवरील घड कापून फेकण्यात आल्याने शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अट्रावल गावातील शेतकरी किरण निळकंठ महाजन यांचे यावल शिवारातील गट क्रमांक ५९४ मध्ये केळीचे शेत आहे. सुमारे ९० आर क्षेत्रात त्यांनी ३ हजार २०० केळीच्या खोडांची लागवड केली होती. मेहनत घेऊन तयार केलेली केळी आता कापणीसाठी योग्य झाली होती. त्यामुळे शेतकरी कुटुंबात समाधानाचे वातावरण होते.
सोमवारी सकाळच्या सुमारास किरण महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन हे शेतमजूर विकास नाले यांच्यासह केळीच्या बागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र शेतात पोहोचताच त्यांना धक्काच बसला. अनेक केळीचे घड कापून जमिनीवर फेकलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती किरण महाजन यांना दिली.
यानंतर किरण महाजन यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता ३ हजार २०० केळीच्या झाडांपैकी तब्बल १ हजार ७०० झाडांवरील घड अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने कापल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणावर केळीचे नुकसान झाल्याने शेतकरी कुटुंबाला जबर आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
अज्ञात माथेफिरूने मुद्दाम नुकसान करण्याच्या उद्देशाने शेतात प्रवेश करून हा प्रकार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील अट्रावल आणि यावल परिसरात अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप पुढील तपास करीत आहेत. पोलिसांकडून परिसरातील संशयित हालचाली आणि मागील घटनांशी संबंधित धागेदोरे तपासले जात आहेत.









