---Advertisement---
जळगाव : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेत संध्या अश्विन कांकरिया यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. जैन हिल्स येथे पार पडलेल्या सभेत नवीन कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
सभेची सुरुवात भगवान महावीर स्वामी, आचार्य सम्राट आनंदऋषीजी, आचार्य शिवमुनिजी तसेच युवाचार्य महेंद्रऋषीजी यांना वंदन आणि सामूहिक नवकार महामंत्र पठणाने झाली. यावेळी महासाध्वी प्रीतिसुधाजी म.सा. व पद्मश्री डॉ. चंदनाजी म.सा. यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेला जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या कांकरिया यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला.
संध्या कांकरिया यांनी मागील वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेत मार्गदर्शनाबद्दल अशोक जैन आणि प्रदीप रायसोनी यांचे आभार मानले. संघाच्या नियमावलीचे वाचन दिलीप चोपडा यांनी केले, तर भविष्यातील रणनीतीबाबत रमण छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना अशोक जैन यांनी समाजातील एकता आणि समर्पणभावाने सेवा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “संघटनात्मक एकता कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. समाज, संघ आणि संतांविषयी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना रोखणे हेच खरे संघहित आहे,” असे ते म्हणाले.









