---Advertisement---
खान्देशात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. या कडक उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), भुसावळच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुपारच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे हाल
मे महिन्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून दुपारी १२ ते ४ या वेळेत तापमानाचा पारा उच्चांकावर असतो. या काळात उष्मघाताचा (Heat stroke) धोका वाढला आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आणि लांबून संस्थेत येतात, त्यांना प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहता आयटीआयची वेळ बदलून ती सकाळी ७ ते दुपारी १२ अशी करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
वेळेत बदल केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि त्यांना दुपारच्या रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दीपक सोनवणे, सुशील मोरे, विलास कोळी, प्रणय भागवत, दशरथ सपकाळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. आता यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









