---Advertisement---
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरात दरवर्षी जाणवणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंगळवारी सुप्रीम कॉलनी येथे महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानामुळे पत्र्याच्या घरांच्या तापमानात चक्क १० अंश सेल्सिअसपर्यंत घट होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत सिद्ध झाले आहे.
“महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत शहरातील गरीब व मध्यमवर्गीय वस्त्यांमधील पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा (Solar Reflective Paint) डबल कोट दिला जात आहे. हा रंग सूर्याची प्रखर किरणे परावर्तित करतो, ज्यामुळे घराचे छत तापत नाही आणि घरातील वातावरण थंड राहते.
४०० घरांचे होणार ‘कुलिंग’
हा प्रकल्प जळगाव महानगरपालिका, ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट (AIDMI), प्रॅक्टिकल ॲक्शन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवला जात आहे. शहरातील खालील भागांतील एकूण ४०० घरांची निवड यासाठी करण्यात आली आहे:
समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी आणि पिंप्राळा हुडको येथील प्रत्येकी १०० घरे.
यामध्ये प्रामुख्याने पत्र्याची घरे आणि ३०० स्क्वेअर फुटांखालील काँक्रीटच्या घरांचा समावेश आहे.
तापमानात १० अंशांची मोठी घट
उद्घाटन प्रसंगी महापौर दीपमाला काळे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वतः ज्या घरावर रंग लावला आहे आणि ज्यावर लावलेला नाही, अशा दोन्ही घरांचे तापमान मोजून पाहिले. यावेळी दोन्ही घरांच्या तापमानात सुमारे १० अंश सेल्सिअसचा फरक दिसून आला. महापौरांनी स्वतः ४-५ घरांची पाहणी करून या प्रकल्पाच्या परिणामकारकतेबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महापौरांसोबत उपआयुक्त पंकज गोसावी, नगरसेविका अनिता भापसे, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, महिला हाउसिंग ट्रस्टच्या मनिषा नाफडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
”वाढत्या उष्म्यामुळे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या उपक्रमामुळे घरातील वातावरण थंड राहण्यास मदत होईल आणि विजेची बचत देखील होईल. शहरातील गरजू भागांत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवली जात आहे.”
— दीपमाला काळे, महापौर









