---Advertisement---
नशिराबाद महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा घाणेरडा चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून चौकशी प्रकरण “मॅनेज” करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांचे नाव समोर आल्याने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण विभाग हादरला आहे.
तक्रारदाराच्या शेतातील कथित अवैध खोदकामाबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणातील चौकशी “अनुकूल” लावून फाईल बंद करण्यासाठी नशिराबाद येथील मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी सुरुवातीला तब्बल १ लाख रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. नंतर सौदेबाजी करत ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली होती.
सरकारी अधिकाऱ्याकडून थेट लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची खातरजमा होताच एसीबीने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. चौकशीत मंडळ अधिकारी देवरे यांनी लाचेची रक्कम स्वतः न घेता खासगी व्यक्ती सुरेंद्र प्रल्हाद अहिरे याच्याकडे देण्याच्या सूचना केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयाबाहेर एसीबीच्या पथकाने जाळे टाकले. यावेळी सुरेंद्र अहिरे हा ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ जेरबंद झाला. या कारवाईमुळे नशिराबाद महसूल विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड्यावर आला असून अधिकारी दलाल साटेलोट्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी ही धडक कारवाई पार पाडली. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.









