NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?

---Advertisement---

 

नवी दिल्ली : NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, सीबीआयच्या तपासात मोठे रॅकेट उघडकीस येत आहे. देशभरात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, टेलिग्रामद्वारे प्रश्नपत्रिका विक्री, कुरिअरने पेपर पाठवणे आणि लाखोंच्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे.
सीबीआयने राजस्थानातील जयपूरमधून तीन, गुरुग्राममधून एक तसेच महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि यश यादव यांचा समावेश आहे.


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा शुभम खैरनार हा करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार करत होता. पुण्यातून कुरिअरद्वारे त्याच्याकडे NEET ची प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने टेलिग्रामच्या माध्यमातून हरियाणामध्ये पेपरची विक्री केल्याचे उघड झाले आहे.
अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे याने शुभमला प्रश्नपत्रिका पाठवल्याचा आरोप असून, शुभमने ती तब्बल 10 लाख रुपयांत खरेदी करून गुरुग्राममधील मध्यस्थांना 15 लाख रुपयांत विकल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. शुभम हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, करिअर कौन्सिलर म्हणून काम करत होता.


दरम्यान, लातूर कनेक्शनचाही तपास वेगाने सुरू असून, खासगी क्लासेस आणि हस्तलिखित प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा आधीच प्रश्न पुरवले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारीनुसार, हस्तलिखित पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष NEET-UG 2026 परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे.
सीबीआयने शुभम खैरनारच्या नांदगाव आणि नाशिक येथील घरांवर छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, तपास यंत्रणांनी चौकशीचा फास आणखी आवळला आहे.


दरम्यान, राजस्थानातील सीकर येथे परीक्षेपूर्वी वितरित करण्यात आलेल्या ‘गेस पेपर’मधील तब्बल 120 ते 135 प्रश्न मूळ परीक्षेशी जुळल्याचा दावा समोर आल्यानंतर NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातून एजंट ओंकार शिंगोटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---