---Advertisement---
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचतीचे केलेले आवाहन आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सुरुवात केली आहे. महापौरांनी सरकारी वाहनाचा वापर कमी करत स्वतः ई-बाईकवरून महापालिकेत हजेरी लावत शहरासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी जोपर्यंत इंधनाची परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत अधिकृत शासकीय वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, जळगाव महापालिकेत दर बुधवारी ‘नो-व्हेइकल डे’ पाळण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या दिवशी महापौर स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणार असून महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही वाहन शेअरिंग, सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दर बुधवारी शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यासोबतच बाहेरगावी होणाऱ्या बैठकींसाठी शासकीय वाहनाऐवजी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. महापौरांच्या या निर्णयाचे शहरातून स्वागत होत असून पर्यावरणपूरक उपक्रमासाठी त्यांचे कौतुक केले जात आहे.









