---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील 20 वर्षीय नवविवाहितेचा संशयित उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैशाली सुनील मोरे (भील) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली ही पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेली होती. समारंभ आटोपून घरी परतल्यानंतर तिला अचानक चक्कर येऊन ती कोसळली. वाढत्या उष्णतेमुळे उष्मघाताची लक्षणे जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत वैशालीचा मृत्यू झाला.
वैशालीचा विवाह अवघ्या 23 एप्रिल रोजी झाला होता. लग्नाच्या केवळ 20 दिवसांनंतरच तिचा मृत्यू झाल्याने सासर आणि माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाज उष्मघाताचा व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.









