---Advertisement---
जळगाव, दि. 14 मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पार्श्वभूमीवर अंजनी प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी 15 मे रोजी प्रकल्पातून बिगरसिंचनाचे 150 क्यूसेकचे आवर्तन सोडण्यात येणार असून यामाध्यमातून धरणगाव तालुक्यातील 11 गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा तसेच बोरी आदी प्रकल्पातून सिंचनासह पेयजलासाठी आरक्षीत पाणीसाठयातून तीन ते चार आवर्तने देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अंजनी प्रकल्प गत मान्सून दरम्यान समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला असून सद्यस्थितीत प्रकल्पपातळी 8.29 दशलक्ष घनमीटर अर्थात 0.29 टिएमसीनुसार सरासरी 53.08 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गिरणा प्रकल्पाच्या आवर्तनातून काही परिसरात लाभ होत असला तरी धरणगाव वा अन्य परिसरात बिगरसिंचनाचे पाणी पोचत नसल्याने पाणी टंचाई मोठया प्रमाणावर जाणवण्यास सुरूवात झाली आहे.
11 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व तसेच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी अंजनी प्रकल्पातून बिगरसिंचनाचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अंजनी धरणातून 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही केली आहे.
यामुळे धरणगाव तालुक्यातील तब्बल 11 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे आवर्तन जीवनदायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आवर्तन केवळ पिण्यासाठी आरक्षित
धरणगाव तालुक्यातील कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या 11 गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.
अंजनी प्रकल्पातून बिगरसिंचनचे सोडण्यात येणारे आवर्तन पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत आहे. हे आवर्तन केवळ पिण्यासाठी आरक्षित असून नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी शेती मोटारपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. तसेच नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
पाण्याचा अपव्यय टाळणे- प्रत्येकाची जबाबदारी
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून हे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पिण्याचे पाणी जपून, काटकसरीने आणि जबाबदारीने वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
गुलाबराव पाटील,
स्वच्छता पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव








