---Advertisement---
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत आज विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी नगरसेवकांमध्येच जोरदार वाद रंगल्याने सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मेहरूण परिसरातील ३० मीटर रस्त्याच्या फेरआखणीच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नगरसेवक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
मेहरूण रस्ता फेरआखणीचा विषय चर्चेसाठी आल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे हा विषय तहकूब करण्याची मागणी भाजप नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी केली. महापौरांनी त्यास सहमती दर्शवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी तीव्र हरकत घेत भाजप एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला. यावरून विष्णू भंगाळे आणि दीपक सूर्यवंशी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. वातावरण इतके तापले की भंगाळे बोलत बोलत सभागृहाच्या लॉबीपर्यंत पोहोचले. अखेर या विषयात शिवसेना तटस्थ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अॅटलांटा महापालिका फसवणूक प्रकरणावरून महापौर दीपमाला काळे यांच्यासह भाजप नगरसेवकांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. दुसरीकडे सत्ताधारी भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने भाजपला समर्थन दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागितला असता महापौरांसोबत त्यांची व्यासपीठावरच शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्यांनी व्यासपीठ सोडून नगरसेवकांच्या बाकांमध्ये येत स्वच्छता, रस्ते आणि प्रशासनाच्या कामकाजावर आक्रमक भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले. “माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असेल तर पुढील महासभेला उपस्थित राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप नगरसेवक अमर जैन यांनी शहरातील वाढत्या अपघातांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला जाब विचारत विविध चौकांतील सर्कल लहान करण्याची मागणी केली. तसेच आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसेवकांमध्येही काही मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक झाल्याने प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष पुन्हा एकदा समोर आला.
दरम्यान, महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.







