---Advertisement---
चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात माकडाच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अनुश्री विशाल मराठे असे मृत चिमुकलीचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप बालिकेच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरजई गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिसरातील जंगल भागात पाण्याची टंचाई आणि तीव्र उष्णतेमुळे माकडे अन्न व पाण्याच्या शोधात गावांकडे वळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गावात नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण होते.
घराजवळ खेळत असलेल्या अनुश्री मराठे हिच्यावर एका माकडाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. उपचारासाठी धावपळ करण्यात आली, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांनी यापूर्वीच माकडांच्या वाढत्या वावराबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिल्याचा दावा केला आहे. मात्र वेळेत उपाययोजना न केल्याने हा निष्पाप जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वन विभागाने माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या घटनेनंतर गावातील पालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून लहान मुलांना घराबाहेर पाठवण्यासही नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे.









