---Advertisement---
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण तिचा खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (२२) याला अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी हा मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील बालवाडी येथील रहिवासी असून, तो चोपडा येथे वास्तव्यास होता. पीडित मुलीचे कुटुंब शेतमजुरी करत होते. ७ सप्टेंबर २०२४ रोजी पीडित मुलगी व तिच्या बहिणी शेतात निंदणीचे काम करत असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने शेताजवळील परिसरात ओढून नेले. त्यानंतर अत्याचाराचा प्रकार घडला.
पीडितेच्या बहिणींनी घरी धाव घेत आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर शोध घेतला असता, मुलगी कपाशीच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. नंतर तिचा मृत्यू झाला.
वैद्यकीय तपासणीत आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. अत्याचारादरम्यान तिचा पाय मोडण्यात आला होता. तसेच तिला सुमारे १०० मीटर फरफटत नेल्याचे तपासात समोर आले. तिच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आले. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड तसेच रक्ताचे डाग आढळून आले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलमे ६५, ६६, १०१(३) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ८ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली होती.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी १४ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच डीएनए अहवालाच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात आले. सरकारी पक्षाने हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
मात्र, न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ६५, १०३ (१) तसेच पॉक्सो कायद्यान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने पीडितेच्या वडिलांना ३० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि शासनाने २५ हजार रुपयांची मदत द्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक वलटे, पोउनि उदयसिंग साळुंखे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वालडे, राहुल रणधीर, सतीश भोई आणि भरत ईशी यांनी तपास व पैरवीत्त सहकार्य केले.









