---Advertisement---
शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथून घरासमोरील अंगणात बांधलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील रहिवासी गोटुसिंग रजेसिंग गिरासे (वय ४६) यांनी त्यांच्या म्हशी नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात बांधल्या होत्या. १७ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १८ मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या दोन्ही म्हशी गोटुसिंग गिरासे यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्या.
चोरीला गेलेल्या म्हशींमध्ये ८० हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची, जाफराबादी जातीची, १० वर्षे वयाची आणि लहान शिंगे असलेली म्हैस, तसेच ५० हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची, नुरा जातीची, लहान व बाकलेली शिंगे असलेली म्हैस, अशा एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशींचा समावेश आहे.
सकाळी म्हशी दिसून न आल्याने गोटुसिंग गिरासे यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गिरासे यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. रवींद्र ठाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









