---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या तीव्र होत असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. इंधन पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक पंपांवर “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही इंधनाचा पुरवठा बंद झाल्याने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इतर अनेक भागांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून वाहनचालकांना इंधनासाठी पंपांवरून पंपांवर फिरावे लागत आहे.
अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे खासगी वाहनधारकांसह मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. इंधन पुरवठा कधी पूर्ववत होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.









