---Advertisement---
जळगाव : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज जळगावातील एम. जे. कॉलेज समोर महाविकास आघाडीच्या युवक संघटनांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. युवासेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी केली. “डायपर लीक होत नाही पण पेपर लीक होतात” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू होताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. यावेळी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाविरोधातही संताप व्यक्त करण्यात आला.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत असून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही करण्यात आला.









