---Advertisement---
सोशल मीडियात स्टेटस ठेवून केला मित्राचा ‘गेम’; बोदवडमध्ये चोरीच्या संशयातून थरार, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना धरले धारेवर!
चोरीच्या संशयावरून एका मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड शहरात घडली आहे. विशेष म्हणजे हत्येपूर्वी आरोपीने सोशल मीडियावर ‘मित्राचा गेम करणार’ असा सूचक स्टेटस ठेवला होता, असा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीच्या अटकेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मृत अन्सार पिंजारीच्या नातेवाईकांनी बोदवड पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून पोलिसांच्या हलगर्जीपणाचा पाढा वाचल्याने या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि एका कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
वादाची ठिणगी: चोरीचा संशय बेतला जीवावर
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अन्सार पिंजारी याच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीमागे आपलाच मित्र अरबाज शाह याचा हात असावा, असा दाट संशय अन्सारला होता. यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून कडाक्याचे वाद सुरू होते. वाद इतका विकोपाला गेला की, अरबाजने अन्सारला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सोशल मीडिया स्टेटसने खळबळ
नातेवाईकांच्या आरोपानुसार, आरोपी अरबाजने हत्येपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्येबाबत सूचक पोस्ट (स्टेटस) ठेवली होती. त्यानंतर त्याने अन्सार पिंजारी याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याला संपवले आणि घटनास्थळावरून फरार झाला.
आमदार मैदानात; थेट मुख्यमंत्र्यांना फोन!
”पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर अन्सारचा जीव वाचला असता,” असा आरोप करत संतप्त स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याला वेढा घातला. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने सुरू केली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन लावून बोदवड पोलिसांच्या बेजबाबदार कारभाराची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत कर्तव्यपालनात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून संबंधित एपीआय (API) आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला तातडीने निलंबित केले आहे.
बोदवडमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन सुरू
परिसरात पोलीस बंदोबस्त: हत्येच्या घटनेमुळे आणि आंदोलनामुळे बोदवड शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अरबाज शाहच्या शोधासाठी बोदवड पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
”आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









