---Advertisement---
नवी दिल्ली : पाच देशांचा महत्त्वपूर्ण दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतताच राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्ली न सोडण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी ४ वाजता दिल्लीत सर्व मंत्र्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीमुळे देशात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, वाढता आंतरराष्ट्रीय तणाव आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमती, इंधन पुरवठा, महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र सरकार विशेष लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी तातडीने वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा केली. देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटांचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटात गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनापूर्वी हालचालींना वेग
राजनाथ सिंह यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ऊर्जा, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारत पूर्णपणे सज्ज आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दरम्यान, मोदी 3.0 सरकारचा पहिला वर्धापनदिन जवळ येत असताना केंद्र सरकारकडून मोठे धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांनाही वेग आला असून, काही महत्त्वाच्या मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.









