---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्णता आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तापमान दोन अंशांनी खाली आले असले तरी हवेत वाढलेल्या दमटपणामुळे घामाच्या धारा सुरूच आहेत. त्यामुळे आता जळगावकरांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून, जिल्ह्यात १५ ते २१ जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात थोडी घसरण झाली आहे. सोमवारी जळगावचे कमाल तापमान ४४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर तापमानात सातत्याने घट होत गुरुवारी ते ४२ अंशांवर आले. मात्र तापमान कमी झाले असले तरी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. दुपारच्या वेळेत हवेत आर्द्रता वाढल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
जळगावात मान्सून कधी दाखल होणार?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच २६ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १० ते १२ जूनदरम्यान तो मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पोहोचू शकतो. मुंबईत आगमन झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत उत्तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल. त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत १५ ते २१ जूनदरम्यान मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मात्र जून महिन्यात एकूण पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, चांगल्या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्या तापमानात घट होऊनही वाढलेल्या दमट वातावरणामुळे जळगावकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.









