---Advertisement---
आम आदमी पक्षाला (AAP) रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणारे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यावर भाजपने आता एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. खासदार चड्ढा यांची राज्यसभेच्या ‘याचिका समितीच्या’ (Committee on Petitions) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आप’मधून भाजपमध्ये गेलेल्या चड्ढा यांना या नियुक्तीमुळे थेट लॉटरी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या १० सदस्यीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून त्याचे अध्यक्षपद राघव चड्ढा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
राघव चड्ढा यांच्या अध्यक्षतेखालील या १० सदस्यीय पॅनेलमध्ये देशातील विविध पक्षांच्या व राज्यांच्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारझारी आणि संतोष कुमार पी. यांचा समावेश आहे.
दुसरी मोठी नियुक्ती
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी २० मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्य डॉ. मेनता गुरुस्वामी यांची ‘कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक २०२६’ संदर्भातील संयुक्त समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
’आप’ आक्रमक; खासदारांना अपात्र करण्याची सभापतींकडे मागणी
राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या अनेक बड्या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर ‘आप’ने आक्रमक पवित्रा घेत राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे या सर्व खासदारांना अपात्र घोषित करण्याची कायदेशीर मागणी केली आहे.
भाजपमध्ये गेलेले ‘आप’चे खासदार
राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालिवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंह साहनी. या सर्व खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी पक्षाने सभापतींकडे पत्र दिले आहे.
ट्रोलिंगमुळे राघव चड्ढा दिल्ली हायकोर्टात!
भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियावर राघव चड्ढा यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावर आक्षेप घेत चड्ढा यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे.
डीपफेक आणि AI चा गैरवापर: सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्याविरोधात प्रसारित होणारे बनावट, AI-जनरेटेड आणि ‘डीपफेक’ व्हिडिओ-फोटो तातडीने हटवण्यात यावेत आणि ब्लॉक करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
प्रतिष्ठेला धक्का: हे कंटेन्ट अत्यंत द्वेषपूर्ण आणि खोटे असून, यामुळे आपल्या कायदेशीर, घटनात्मक आणि व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होत आहे, तसेच यामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान होत असल्याचे चड्ढा यांनी कोर्टात म्हटले आहे.









