---Advertisement---
राज्यात आणि देशात सध्या सुरू असलेल्या भीषण इंधन टंचाई आणि दरवाढीवरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “निवडणुका सुरू होत्या तोपर्यंत प्रचारासाठी यांच्या गाड्या दणादण पळत होत्या, तेव्हा पेट्रोल-डिझेल कमी पडले नाही. मात्र निवडणुका संपताच सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले,” असा गंभीर आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनांचा समाचार घेताना त्यांनी, “शेतकऱ्यांनी आता शेती कोरडी पडली तरी चालेल, पण पेरण्या आणि नांगरणी करू नये,” असा खोचक टोलाही लगावला.
’ट्रॅक्टर शेतात अन् मालक कॅन घेऊन पंपावर!’ ग्रामीण भागातील वास्तव मांडले
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांचे अत्यंत विदारक वास्तव मांडले. ते म्हणाले, “सध्या ग्रामीण भागात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर शेतात उभा आहे आणि त्याचा मालक पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन तासनतास रांगेत उभा आहे. उद्या जर घरात एखादी वैद्यकीय आणीबाणी (Medical Emergency) आली, किंवा कोणाला सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचे असेल, तर लोकांनी इंधनाशिवाय कसे जायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदींच्या आवाहनावर टोलेबाजी: “मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय”
पंतप्रधानांच्या विविध आवाहनांचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी आपल्या उपरोधिक शैलीत टोला लगावला.
”मोदींचे आवाहन खरोखरच अवघड असते. मी तर त्यांच्या आवाहनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. अगदी मी स्वतः डोक्याला तेल लावणेही बंद केले आहे; कारण त्यांच्या धोरणांमुळे मी आता ‘तेल वाचवा’ मोहीम सुरू केली आहे,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यात डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे नांगरणी आणि इतर शेतीकामांना मोठा ब्रेक लागला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी थेट शेतकऱ्यांना पेरण्या न करण्याचे आवाहन करत सरकारला धारेवर धरल्याने, आता या इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.









