---Advertisement---
तालुक्यातील गलंगी येथे ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अनवर्दे बुद्रुक येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना २१ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात मनीष कोळी आणि अमित गायकवाड या दोन उमद्या तरुणांचा मृत्यू झाला असून, यामुळे अनवर्दे परिसरावर शोककळा पसरली आहे.
पेट्रोल पंपाजवळ काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अनवर्दे येथील मनीष उर्फ राज रवींद्र कोळी (वय २५) आणि अमित वासुदेव गायकवाड (वय २०) हे दोघे तरुण दुचाकीने शिरपूरच्या दिशेने जात होते. गलंगी येथील सुधाकर पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक: एमएच-१८, ईजी- ३४३६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, राज आणि अमित या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश
अपघातानंतर दोघांनाही तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. दोन्ही मृत तरुण हे अत्यंत सामान्य कुटुंबातील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मयत मनीष आणि अमित यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणी डॉ. पवन पाटील यांच्या माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कोळी करत आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच चोसाकाचे माजी व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, अनवर्द बुद्रुकचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल रोहिदास पाटील, सुभाष कोळी, माधवराव पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात दोन्ही तरुणांवर अनवर्दे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.









