हृदयद्रावक: अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न, शेतात रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

---Advertisement---

 

​यावल: तालुक्यातील दहिगाव येथे शेतीकाम करताना झालेल्या एका भीषण आणि अत्यंत दुर्दैवी अपघातात २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शेतात रोटावेटरचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडल्याने ही घटना घडली. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर या तरुणाचा विवाह ठरेलेला असतानाच काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.


​तोल गेला अन् थेट चाकाखाली सापडला!

​मिळालेल्या माहितीनुसार, योगेश यशवंत पाटील (वय २८, रा. दहिगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास तो आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारण्याचे काम करत होता. काम सुरू असतानाच अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट चालत्या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर रोटावेटरमध्ये अडकल्याने त्याचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला.
​अपघातानंतर ट्रॅक्टर चालूच अवस्थेत पुढे जात शेजारील शेतात पोहोचला. परिसरातील एका तरुणाने हा थरार पाहताच तातडीने धाव घेऊन ट्रॅक्टर बंद केला आणि योगेशच्या कुटुंबाला माहिती दिली.


​रुग्णालयात नेण्यापूर्वीच संपला श्वास
​घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. गंभीर जखमी अवस्थेत योगेशला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


​१८ जूनला होणार होते लग्न, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

​लग्नाच्या तयारीत विरजण: मयत योगेशचा विवाह येत्या १८ जून रोजी होणार होता. घरात लग्नाची लगबग आणि खरेदीची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या भयानक घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन विवाहाच्या तोंडावर उमद्या मुलाचा असा अंत झाल्याने दहिगावसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, शेतीकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे महत्त्व किती गरजेचे आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---