जळगावात उष्माघाताने मजूरासह तरुणाचा मृत्यू? परिसरात खळबळ; शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार…

---Advertisement---

 

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात उष्म्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पहिली घटना जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे घडली. ५७ वर्षीय केशरलाल दौलत पाटील हे सेंट्रिंगचे काम करत असताना दुपारच्या कडक उन्हात अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर दुसरी घटना जळगाव शहरातील चित्रा चौक परिसरात घडली. ३६ वर्षीय प्रवीण दत्तू मिस्तरी हा तरुण रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यालाही मृत घोषित केले.

दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशांच्या आसपास कायम असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

“दोन्ही मृत्यूंचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. प्राथमिक अंदाज उष्माघाताचा आहे.” अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---