---Advertisement---
देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी बदल्यांचा नेहमीचा ३१ मेचा मुहूर्त यंदा टळणार असून, शासनाला ३० जूनपर्यंत ही बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनातील सुमारे १९०० कर्मचाऱ्यांचा सध्याच्या जागेवरील मुक्काम आणखी महिनाभरासाठी वाढला आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी दरवर्षी ३१ मे ही अंतिम मुदत मानली जाते. त्यानंतर केवळ प्रशासकीय गरजेनुसारच किरकोळ बदल्या केल्या जातात. यंदाही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. महसूल विभागात २९ मे रोजीच बदल्यांचे आदेश जारी होण्याची शक्यता होती, कारण ३० आणि ३१ मे रोजी सुटी असल्याने त्याआधीच प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. समुपदेशनाची रूपरेषाही निश्चित झाली होती. मात्र, ऐनवेळी मुदतवाढ जाहीर झाल्याने बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक व वैयक्तिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
केंद्र सरकारचे निर्देश अन् राज्याचा अध्यादेश
देशात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. त्यानुसार १६ मे ते १४ जून या कालावधीत घरयादी तयार करणे आणि घरगणना प्रक्रिया राबविली जात आहे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
या निर्देशांचे पालन करण्यासाठी राज्य सरकारला बदल्यांच्या अधिनियमात सुधारणा करावी लागली आहे. या मुदतवाढीसाठी राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश (Ordinance) जारी करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आता सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
बदल्या पुढे ढकलण्यात आलेल्या १९०० कर्मचाऱ्यांमध्ये खालील विभागांचा समावेश आहे.
विभाग रखडलेल्या बदल्या (अंदाजे संख्या)
पोलीस विभाग १६०० कर्मचारी
जिल्हा परिषद (ZP) २०० कर्मचारी
महसूल विभाग १५२ कर्मचारी
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यातील अनेक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त (Relieve) देखील करण्यात आले आहे. त्यामुळे ते नवीन जागी रुजू होण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उर्वरित २०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर पडल्याने, “आधी बदली झालेले कर्मचारी खरोखरच लकी ठरले,” अशी मिश्कील चर्चा आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगू लागली आहे.









