---Advertisement---
भारतात कागदी नोटांच्या जागी पॉलिमर अर्थात प्लास्टिक नोटा आणण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या पर्यायाचा गंभीरपणे विचार करत असून, लवकरच यासंदर्भात पायलट प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कागदी नोटा लवकर खराब होणे, त्यांचा वाढता छपाई खर्च आणि चलनाची सातत्याने वाढणारी मागणी या पार्श्वभूमीवर हा पर्याय पुढे येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पटना आणि मुंबई येथे झालेल्या आरबीआयच्या अलीकडील बोर्ड बैठकीत पॉलिमर नोटांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या नोटा साध्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ मानल्या जातात. त्या सहज फाटत नाहीत, पाण्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही त्या अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतात.
‘बिजनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार, अशा नोटांसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि यंत्रणा आरबीआयकडे उपलब्ध आहे. सुरुवातीला या नोटांच्या उत्पादनाचा खर्च जास्त असला, तरी त्यांचे आयुष्य अधिक असल्याने दीर्घकालीन खर्च तुलनेने कमी राहू शकतो. त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याची गरजही कमी होईल.
महत्त्वाच म्हणजे, देशातील बहुतांश एटीएम मशिन्स पॉलिमर नोटा हाताळण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही.
आरबीआयच्या 2025 च्या वार्षिक अहवालात नोटा छपाईवरील खर्चात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये नोटा छपाईसाठी 5,101.4 कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील वर्षात हा खर्च वाढून 6,371.8 कोटी रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर खराब झालेल्या नोटांची संख्याही वाढली आहे. 2025 या आर्थिक वर्षात सुमारे 23.8 अब्ज नोटा बाजारातून परत घ्याव्या लागल्या, ज्यामध्ये 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक होते.
डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असले तरी देशातील रोख चलनाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 15 मेपर्यंत चलनातील एकूण रकमेने 42.86 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठला असून, त्यात वार्षिक 11.5 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच चलनात आणखी 1.15 ट्रिलियन रुपयांची वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि कमी देखभाल खर्चाच्या पॉलिमर नोटा हा पर्याय आरबीआयसाठी अधिक व्यवहार्य ठरू शकतो, अशी चर्चा आता आर्थिक क्षेत्रात सुरू झाली आहे.









