जळगावात शेतकऱ्यांचा एल्गार; महावितरणला अखेर माघार घेण्यास पाडले भाग!

---Advertisement---

 

जळगावात ‘मविआ’चे आगळेवेगळे ठिय्या आंदोलन यशस्वी; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळण्याचा मार्ग मोकळा

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि महावितरणचा मनमानी कारभार याविरोधात आज जळगावात राजकीय पक्ष आणि शेतकरी रस्त्यावर उतरले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज एक आगळेवेगळे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनापुढे अखेर वीज वितरण कंपनीला नमावे लागले असून, जळगाव ग्रामीण, चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे.


.तर ग्राहक मंचात खेचू: प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांचा इशारा
आंदोलनादरम्यान शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ नुसार सुरळीत वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे. गेल्या महिनाभरापासून पुरवठा खंडित करून महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) च्या गुणवत्ता मानकांचा (SOP) थेट भंग केला आहे. हा पुरवठा त्वरित सुरू न झाल्यास आम्ही CGRF, विद्युत लोकपाल आणि ग्राहक मंचात महावितरणविरोधात भरपाईसाठी दावा दाखल करू!”


शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या:
१) शेतकऱ्यांना विनाखंडित सलग १० तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे.
२) पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.
अखेर लेखी आश्वासन; आंदोलन यशस्वी
आंदोलनाचा वाढता जोर आणि कायदेशीर कारवाईचा इशारा पाहून महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे जाहीर केले. केवळ तोंडी आश्वासनावर शेतकरी मागे हटत नसल्याचे पाहून, वीज वितरण कंपनीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांना या संदर्भातील अधिकृत लेखी प्रत सुपूर्द केली. यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.


या आंदोलनात शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हा अध्यक्ष कल्पिताताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, तालुकाध्यक्ष रिंकू चौधरी (महानगर), संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे, संजय जाधव, वाय. एस. महाजन, हिलाल पाटील, बाळू धनगर, बाळू पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


आश्वासनाची ‘लाईट’ टिकणार का?
ऐन पिकांच्या हंगामात महावितरणने घेतलेली ही माघार म्हणजे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि विरोधकांच्या आक्रमकतेचा विजय म्हणावा लागेल. विशेष म्हणजे, केवळ घोषणाबाजी न करता थेट ‘विद्युत कायद्या’च्या (MERC आणि SOP) चौकटीत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याची विरोधकांची रणनीती यशस्वी ठरली. त्यामुळेच प्रशासनाला तात्काळ लेखी पत्र देण्याची नामुष्की आली. आता मिळालेले ८ तासांचे हे आश्वासन केवळ कागदावरच राहते की शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचते, यावरच महावितरणची विश्वासार्हता अवलंबून असेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---