---Advertisement---
डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणारी हैदराबादस्थित मॅरिट्रोनिक्स लिमिटेड आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. तब्बल 36 वर्षांचा उद्योग अनुभव असलेल्या या कंपनीने बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर आयपीओ आणण्यासाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. या इश्यूद्वारे कंपनी सुमारे 70.03 कोटी रुपये उभारणार आहे.
या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे, कारण अनुभवी गुंतवणूकदार मधू केला यांनी त्यांच्या ‘फाउंडर्स कलेक्टिव्ह फंड’मार्फत कंपनीत 3.61 टक्के हिस्सा घेतला आहे. त्यामुळे बाजारात या इश्यूबाबत उत्सुकता वाढली आहे.
कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 141 ते 149 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान 2000 शेअर्सचा एक लॉट ठेवण्यात आला असून त्यासाठी जवळपास 2.98 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी इश्यू 29 मे रोजी खुला झाला असून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 1 जून ते 3 जून 2026 दरम्यान खुला राहणार आहे. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असून कंपनी 47 लाख नवीन शेअर्स बाजारात आणणार आहे.
आर्थिक कामगिरीच्या बाबतीतही कंपनीने गेल्या काही वर्षांत मजबूत वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 8,569.91 लाख रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2026 मध्ये वाढून 15,589.56 लाख रुपयांवर पोहोचला. निव्वळ नफ्यातही मोठी झेप दिसून आली आहे. दोन वर्षांपूर्वी 305.03 लाख रुपये असलेला नफा आता 1,610.30 लाख रुपयांवर गेला आहे.
कंपनीच्या एबिटडा मार्जिनमध्येही सुधारणा झाली असून ते 7.82 टक्क्यांवरून 17.42 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याचवेळी कर्ज-इक्विटी गुणोत्तर 1.93 वरून कमी होऊन 0.81 वर आले आहे, ज्यामुळे कंपनीवरील कर्जाचा भार कमी झाल्याचे दिसून येते.
आयपीओमधून मिळणारा निधी कंपनी विविध विस्तार योजनांसाठी वापरणार आहे. नवीन यंत्रसामग्री खरेदी, खेळते भांडवल वाढवणे आणि विद्यमान कर्जाची परतफेड यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. या इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून GYR Capital Advisors काम पाहत आहेत.
1988 मध्ये स्थापन झालेली मॅरिट्रोनिक्स कंपनी संरक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी राहिली आहे. कंपनी 2009 पासून BEL आणि 2012 पासून HAL सोबत काम करत आहे. तसेच हनीवेल एरोस्पेसच्या माध्यमातून युरोपमध्ये निर्यातही करत आहे. मिसाईल सीकर असेंब्ली, एअरबोर्न रडार सिस्टीम आणि डिफेन्स एअरक्राफ्ट सिस्टीम या क्षेत्रांमध्ये कंपनीची विशेष ओळख आहे.
जागतिक अणुसंशोधन संस्था CERN च्या प्रकल्पांसाठी TIFR मार्फत कंपनीची वेंडर म्हणून निवड करण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दोवारी अमरनाथ हे IIT मद्रासचे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर असून त्यांना या क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.









