---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उत्राण गावात एका सार्वजनिक कोरड्या विहिरीत गुरांची कातडी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातल्या या कोरड्या विहिरीतून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्राण गावातील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक कोरड्या विहिरीतून गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी येत होती. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक पोलीस पाटलांनी या प्रकाराची माहिती कासोदा पोलीस ठाण्याला दिली.
या बाबत माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस अधिकारी, पंच आणि पशुधन विकास विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत विहिरीची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान विहिरीत प्लास्टिकच्या गोणीत भरून ठेवलेली सुमारे १४ किलो वजनाची गुरांची कातडी आढळून आली. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केलेल्या प्राथमिक पाहणीत ही कातडी गोवंश सदृश प्राण्यांची असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित कातडी ताब्यात घेत सीलबंद केली. तसेच विहिरीतील इतर अवशेषांचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, कातडी विहिरीत कशी आणि केव्हा टाकण्यात आली, याचा तपास सध्या सुरू आहे.
मात्र, या घटनेमुळे उत्राण गावासह परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कासोदा पोलीस करीत आहेत.









