---Advertisement---
एरंडोल शहरातील धरणगाव चौफुली ते पंचायत समिती कार्यालयादरम्यानचा प्रमुख मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखालील अवैध पार्किंग, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली व्यावसायिक अतिक्रमणे आणि रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या शेकडो दुचाकींमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धरणगाव चौफुली परिसरातील उड्डाणपुलाखाली अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे. याशिवाय अवजड वाहनांची अवैधरित्या पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणापासून अल्प अंतरावर पोलीस प्रशासनाचे कार्यालय असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
धुळे, जळगाव, म्हसावद आणि चोपडा या भागांकडे जाणाऱ्या वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी उड्डाणपुलाखाली काही युवकांचे टोळके जमा होत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहराबाहेरील नवीन वसाहतींमधील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याच मार्गाचा नियमित वापर करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सायंकाळच्या वेळेत विविध खाद्यपदार्थ आणि थंडपेय विक्रेत्यांच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे पोलीस स्थानकासमोरच ही परिस्थिती असतानाही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंचायत समितीच्या वळणाजवळ रस्त्यावरच टेबल टाकून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे वाहनांना वळण घेताना अडचणी निर्माण होत असल्याचेही सांगितले जात आहे. अवघ्या दीडशे मीटर अंतरात जवळपास ८० व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, अशीही चर्चा शहरात सुरू आहे.









