---Advertisement---
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या एकूण 16 उमेदवारांपैकी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ चार उमेदवार उरले आहेत. यामुळे आता खरी रंगत वाढली असून जळगावातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि प्रहार जनशक्ती संघाचे पदाधिकारी तथा अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात आता थेट सामना रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर जळगावच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. विशेषतः शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले असून निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे हे देखील जोरदार तयारीला लागले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर सर्वच उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांची उपस्थितीही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग येणार असून जळगाव विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









