---Advertisement---
जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत मुंबईत ठेवण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. संभाव्य राजकीय दबाव किंवा उमेदवारी मागे घेण्याच्या शक्यतेचा अंदाज घेऊन शिवसेना (ठाकरे गट) नेतृत्वाने ही खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शरद तायडे यांना मुंबईत बोलावण्यात आले होते. या काळात त्यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात ठेवण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षाकडून किंवा सत्ताधारी नेत्यांकडून कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याची संधी मिळू नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट)ने शरद तायडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील हे देखील मुंबईत उपस्थित होते.
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर शरद तायडे यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासोबतचा छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर उमेदवाराला मुंबईत ठेवण्यात आल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.
शिवसेना (ठाकरे गट)चे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीही शरद तायडे यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने उमेदवाराबाबत विशेष सावध भूमिका घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.









