---Advertisement---
मुंबई : देशात सातत्याने गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पृष्ठभूमीवर, महाराष्ट्रात आगामी परीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरळीत आणि तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी हाय-अलर्टवर राहावे, असे कडक निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी सायबर सुरक्षा आणि कडक देखरेखीवर भर दिला आहे.
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही काळातील नीट परीक्षांच्या घोटाळ्यांचे धागेदोरे महाराष्ट्रातील पुणे आणि लातूर येथे प्रकर्षान जोडले गेले होते. वैद्यकीय शिक्षणाचे हब असलेल्या लातूर आणि पुण्यात रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी तत्कालीन सरकारला पुरते धारेवर धरले होते. याच पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे थेट आदेश दिले आहेत.
या दोन्ही जिल्ह्यांत परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची ओळख पडताळणी आणि तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली जाणार आहे. याशिवाय, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवून त्याचे थेट नियंत्रण केले जाईल. कोणताही गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि शिक्षण विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘नीट’च्या गोंधळावरून अफवा पसरविणाऱ्यांना इशारा
पेपरफुटी आणि निकालातील त्रुटींवरून विरोधकांनी नेहमीच सरकारला लक्ष्य केले आहे. हीच राजकीय संवेदनशीलता ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला समाजमाध्यमांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षेबाबत कोणतीही अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती समोर आल्यास, गृह विभाग आणि सायबर सेलने तातडीने त्याचा खुलासा करावा, जेणेकरून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









