---Advertisement---
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेला भीमराव प्रभाकर कांबळे याच्याविरोधात विशेष न्यायालयात आतापर्यंत ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून, सरकार पक्षाने विविध वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पुरावे सादर केले आहेत.
सरकारी पक्षाच्या मते, मृत बालिकेच्या नखांमध्ये अडकलेली त्वचा आणि आरोपीचे जैविक नमुने यांची तपासणी करण्यात आली. तसेच पीडितेचे रक्त आरोपीच्या कपड्यांवर आढळल्याचे न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. डीएनए विश्लेषण अहवालातून घटनेच्या काळात पीडिता आरोपीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सरकारी पक्षाने केला आहे. एवढच नाही तर आरोपी हा जनावरांसोबत हि अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याची महत्वाची साक्ष एका साक्षीदाराने नोंदविली आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सादर केलेल्या युक्तिवादात वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालांना विशेष महत्त्व दिले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो मानसिकदृष्ट्या सक्षम आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले.
या खटल्यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुन्ह्याशी संबंधित वस्तूंची जप्ती. तपासादरम्यान आरोपीने काही वस्तू नसरापूर येथील राम मंदिर परिसरात लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती आणि आरोपीच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्याला प्रत्यक्ष घटनास्थळी नेणे शक्य झाले नाही.
त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी दोन पंचांना संबंधित ठिकाणी पाठविले. आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे जोडण्यात आले आणि त्याने दाखविलेल्या ठिकाणावरून संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेचा पंचनामा तयार करण्यात आला. न्यायालयात हा ‘व्हर्च्युअल पंचनामा’ कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य असल्याचे सिद्ध करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला आहे.
कायदेशीर प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे जप्तीची कार्यवाही नोंदविण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे न्यायव्यवस्था आणि कायदेतज्ज्ञांचे विशेष लक्ष लागले आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी वेगाने सुरू आहे.
या प्रकरणातील पुढील सुनावणीत आणखी साक्षीदारांची साक्ष आणि तपासाशी संबंधित पुरावे न्यायालयासमोर सादर होण्याची शक्यता आहे.









