पहिल्याच पावसात नशिराबादची दाणादाण; तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवर सांडपाणी, वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे पत्रे उडाले, जीवितहानी टळली…

---Advertisement---

 

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाने नशिराबादमधील घरांची पडझड, तुंबलेल्या गटारीची वास्तवस्थिती समोर आणली आहे. पावसाळ्यापूर्वी गटारींची साफसफाई पूर्ण केल्याचा दावा नगरपरिषदेकडून करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात अनेक भागांतील गटारी तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवर वाहू लागले असून प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गावातील विविध परिसरांमध्ये गटारी ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यांवर घाण पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामांसाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये दुर्गंधी पसरल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तुंबलेल्या गटारींमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसासोबत आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यानेही काही ठिकाणी नुकसान केले. गावातील काही घरांवरील पत्र्यांची छप्परे उडून गेली असून नशिराबाद टोल नाक्यावरील शेडचाही काही भाग नुकसानग्रस्त झाला आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.

नशिराबाद पोलीस स्टेशनसमोरील छोट्या बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरात अपघाताचा धोका वाढला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काही भागांमध्ये गटारींची साफसफाई करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी अद्याप योग्य देखभाल झालेली नाही. त्यामुळे उर्वरित भागांतील गटारी तातडीने स्वच्छ कराव्यात, पाणी साचणाऱ्या ठिकाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी तसेच वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

पहिल्याच पावसात समोर आलेल्या या समस्यांमुळे आगामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---