---Advertisement---
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
मागील काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी अंतुर्ली येथील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली तसेच प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्रांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रक्षाताई खडसे यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ संबंधित विमा कंपनी, कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नोंदविण्याचे आवाहन केले. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रशासन, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.









