---Advertisement---
जळगाव एमआयडीसी परिसरातील एल सेक्टरमध्ये कुलर निर्मिती करणाऱ्या एका कंपनीला दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये असलेल्या कुलर निर्मिती कंपनीत दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीत कुलर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत, प्लास्टिक साहित्य आणि इतर ज्वलनशील वस्तू साठवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आगीने अल्पावधीतच भीषण स्वरूप धारण केले.
आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेत आग आटोक्यात आल्याने शेजारील औद्योगिक युनिट्सपर्यंत आग पसरण्याचा धोका टळला.
या आगीत कुलर निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मोटारी, प्लास्टिकचे घटक आणि इतर यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे. त्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर संबंधित विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील उद्योजक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









