मोठी बातमी: नाशिकमध्ये महायुतीसमोरील मोठा अडथळा दूर; बंडखोर प्रसाद हिरेंची माघार, नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर, गिरीश महाजनांना काही अंशी यश…

---Advertisement---

 

नाशिक-जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून महायुतीच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपल्यानंतरही बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या एकजुटीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, “आमचे दोन्ही उमेदवार माघार घेतील, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे प्रसाद हिरे यांनी अधिकृतरीत्या अर्ज मागे घेऊ शकत नसले तरी त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.”

यावेळी त्यांनी जळगावमधील परिस्थितीवरही भाष्य केले. “नाशिकचा प्रश्न मिटला की जळगावचाही प्रश्न सुटेल. गोकुळ गिते यांच्याशीही चर्चा सुरू आहे. सायंकाळपर्यंत आणखी काही निर्णय होऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्षाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर आली असून वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाजन यांनी विधान परिषद निवडणुकीतील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही व्यक्त केला. नाशिकमधील बंडखोरी शमल्याने आता जळगावच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमधील या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले असून पुढील काही तासांत जळगावच्या राजकारणातही महत्त्वाच्या हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---