---Advertisement---
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, आरोग्य आणि नालेसफाईच्या कामांना गती देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेत सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत शहरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देत, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना थेट दंड करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, जळगाव शहरात स्वच्छता राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समान जबाबदारी स्वीकारली पाहिजे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, व्यापारी किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कोणतीही दया न दाखवता दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विशेषतः उसाचा रस विक्रेते, फेरीवाले आणि व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्यास तात्काळ कारवाई करावी.
प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराबाबतही त्यांनी कडक भूमिका घेतली. ज्या दुकानांमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ग्लास किंवा थर्माकोल साहित्याची विक्री होत असेल, त्यांच्यावर कारवाई करून गरज पडल्यास दुकाने सील करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्लास्टिकमुळे नाले व गटारी तुंबत असल्याने नागरिकांमध्ये कापडी आणि जैवविघटनशील पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा संकलन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. शहरातील प्रत्येक वॉर्डात नियमित स्वच्छता व्हावी, घंटागाड्या वेळेवर फिराव्यात, रस्ते आणि गटारी स्वच्छ राहाव्यात तसेच कचरा त्वरित उचलला जावा, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मलेरिया विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. फॉगिंग मशीन, फवारणीसाठी लागणारी औषधे आणि इतर यंत्रसामग्रीची उपलब्धता तपासून आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, नाले तुंबणे किंवा सांडपाणी साचणे अशा तक्रारी येऊ नयेत, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कार्यालयात बसून काम न करता नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील गैरप्रकार, भ्रष्टाचार किंवा आर्थिक व्यवहारांबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका असल्याचे स्पष्ट करत, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य अधीक्षक समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, मलेरिया विभागाचे अधिकारी तसेच बीव्हीजी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









