---Advertisement---
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आपल्याविरोधात आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
एसआयटी चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांबाबत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाशी संबंधित असून आध्यात्मिक श्रद्धेपोटी त्यांनी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरुस्थानी मानले होते. मात्र, त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच अशोक खरात यांच्याकडे जाण्यासाठी किंवा त्यांच्या संपर्कात येण्यासाठी आपण कोणत्याही महिलेला प्रोत्साहन दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खरात यांच्यावरील गंभीर आरोप आणि त्यांची दुसरी बाजू आपल्याला माहीत नव्हती, असेही चाकणकर यांनी चौकशीदरम्यान नमूद केले.
अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि खोटी माहिती यांचा वापर करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. जमीन व्यवहार प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत त्या कोणत्याही व्यवहारात भागीदार नव्हत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना चाकणकर यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला. महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांच्यासह काही व्यक्तींनी संधी साधून आपल्यावर चिखलफेक केल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व संबंधितांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आल्याचे सांगत, त्या प्रकरणाच्या सुनावणीवेळी आपणही न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुपाली चाकणकर यांच्या या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आगामी न्यायालयीन प्रक्रियेकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









