---Advertisement---
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या प्रश्नाने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चर्चांना आणखी रंग मिळाला तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला बोलावल्याच्या बातमीमुळे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पहिल्यांदाच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना फेटाळले आहे. पक्षाकडून काँग्रेसला कोणताही विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही आणि काँग्रेसकडूनही असा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. जर या प्रकारचा प्रस्ताव आला असता तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याची माहिती आम्हाला निश्चितच देण्यात आली असती, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाचं म्हणजे मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतही काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही ठोस तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला.
तर मात्र दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होताना केलेल्या एक महत्वाच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वी शरद पवार यांनी दिला होता. मात्र काही कारणांमुळे कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, संविधानासमोरील आव्हाने आणि धर्मनिरपेक्ष मतांचे होणारे विभाजन रोखण्यासाठी समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनीही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाचे संरक्षण आणि सत्ताधाऱ्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र काँग्रेसकडून अधिकृत प्रस्ताव मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव आल्यास पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमध्ये नव्या राजकीय आघाड्या किंवा संघटनात्मक बदल घडू शकतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विलिनीकरणाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा दिलेला नसल्याने या चर्चांभोवतीचे गूढ कायम आहे.









