---Advertisement---
महाराष्ट्रात अनेक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, आणि अशीच एक घटना म्हणजे कराडमध्ये पत्नीने पतीच्या मृत्यूचा कट रचल्याची, आणि विशेष म्हणजे हत्येची सुपारी पत्नीने तिच्या भावालाच दिली होती. घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पहाटे घडलेला अपघात समजला जाणारा प्रकार प्रत्यक्षात नियोजनबद्ध खून असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या खुनामागे मृत अभियंत्याची पत्नी आणि तिचा भाऊ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृदू व जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले मृत लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यूची घटना सुरुवातीला रस्ते अपघात म्हणून समोर आली होती. पहाटेच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या लक्ष्मण मंडले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्नीने अपघात झाल्याचे सांगितले, परंतु तिच्या बोलण्यात आणि हालचालींमध्ये आढळलेल्या विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला.
त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण प्रकरणाचा थरारक उलगडा झाला. फुटेजमध्ये लक्ष्मण मंडले रस्त्याने चालत असताना एका कारने त्यांना मुद्दाम मागून धडक दिल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर धडक दिल्यानंतर आरोपींनी वाहन पुन्हा पुढे-मागे करत त्यांना चिरडल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्याजवळील साहित्य घेऊन आरोपी पसार झाले. काही वेळाने ते पुन्हा घटनास्थळी परतले आणि जखमी अवस्थेत पडलेल्या लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर पुन्हा वाहन घालून त्यांचा मृत्यू निश्चित केल्याचे तपासातून उघड झाले.
पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पत्नी सुरेखा मंडले हिने आपल्या भावासोबत मिळून हा कट रचला होता. जवळपास महिनाभर पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. आणि त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यांचे लोकेशन मिळवून योग्य संधीची वाट पाहण्यात आली. अखेर अपघाताचा बनाव रचत नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आणि सुपारी स्वीकारणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. कराड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची अनेक पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
एक साधा अपघात वाटणाऱ्या घटनेमागे इतका थरारक कट दडलेला असल्याचे समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचा संशय, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातील बारकावे यामुळे अवघ्या 12 तासांत या हत्येचे गूढ उलगडले आणि एका शातिर कटाचा पर्दाफाश झाला.









